अमरावती ,राज माहोरे ( प्रतिनिधि ) : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २१ लाख ९२ हजार ३९५ मतदारांची नोंद असून, ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २ हजार ६८२ वरून वाढून २ हजार ७०४ झाली आहे.
सर्व पात्र मतदारांनी तसेच वगळण्यात आलेल्या मतदारांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ‘एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही’ या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ११ लाख २४ हजार ८३ पुरुष, १० लाख ६८ हजार २५१ महिला आणि ६१ तृतीयपंथी, असे एकूण २१ लाख ९२ हजार ३९५ मतदार आहेत.
३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे वगळली
प्रारूप मतदार यादीतून १ लाख ९ हजार ३०७ मय्यत, २२ हजार ३५७ आढळून न आलेले, १ लाख ६४ हजार ५१३ कायमस्वरूपी स्थलांतरित, ९७८ इतर तसेच ५६ हजार १४२ आधीच नोंदलेले मतदार, अशा एकूण ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
जिल्ह्यात २२ मतदान केंद्रांची वाढ
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २ हजार ६८२ वरून वाढून २ हजार ७०४ झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या ३४५ वरून ३५४, अमरावतीमध्ये ३२२ वरून ३२८ आणि मेळघाटमध्ये ३५६ वरून ३६३ झाली आहे.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदवाव्यात
अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व आक्षेप नोंदवावेत. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


