चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरात ‘क्रीडा पर्व २०२६’ ची उत्साहात सांगता झाली. डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटी (ड्रीम), चंद्रपूरच्या वतीने या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा पर्वांतर्गत कबड्डी, खो-खो, हॉकी, रस्सीखेच आणि नेटबॉल आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये स्थानिक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य दाखविले. खेळाडूंमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी तसेच आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात महापौर संगीता खांडेकर, पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके, जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखोंडे (पोलीस ठाणे रामनगर), क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड आणि मिलिंद तेलंग यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
‘क्रीडा पर्व २०२६’ यशस्वी करण्यासाठी ड्रीम, चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे, स्पर्धा सचिव विक्की पेटकर यांच्यासह निखिल पोटदुखे, राजकुमार जांबुळे, सूरज गंधेवर, शुभम साखरे, शुभम पुणेकर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, भारत विरुटकर, अपूर्व खुळसंगे, हर्षल वरारकर, श्लोक मित्तल, अमन मंडल, आर्यन मोहुर्ले, प्रमोद मेश्राम, सोनाली गावंडे, कोमल कुवर, श्रुती भारती, शर्वरी लभाने, कोमल चौधरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय तावाडे यांनी केले.



