कारागृहाच्या भिंतीआड दाटला मायेचा ओलावा!

‘गळाभेट’ने बंदीजनांच्या डोळ्यांत अश्रू; ६२ बंद्यांची ७४ मुलांशी हृदयस्पर्शी भेट

अमरावती, राज माहोरे( प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमरावती मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘गळाभेट’ कार्यक्रमात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. तब्बल ६२ बंदीजनांना त्यांच्या १८ वर्षांखालील ७४ मुला-मुली आणि नातवंडांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. लेकरांना पाहताच अनेक बंदीजनांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर मुलांनीही आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारत भावना व्यक्त केल्या.

मा. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, मुख्यालय, पुणे तसेच मा. वैभव आगे, कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कारागृहातील बंद्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी, ई-मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पत्रव्यवहाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेटीचा मायेचा स्पर्श वेगळाच असतो. विशेषतः बालवयातील मुलांसाठी पालकांची मिठी आणि सहवास भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने कारागृह विभागाकडून मागील दहा वर्षांपासून ‘गळाभेट’ उपक्रम राबविला जात आहे.

शनिवार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात ६२ बंद्यांनी ७४ मुला-मुली व नातवंडांची भेट घेतली. सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या बंद्यांसोबत त्यांच्या १६ पालकांनाही नियमानुसार कारागृहात प्रवेश देण्यात आला. ओळखपत्रांची तपासणी केल्यानंतर मुलांना बंदीजनांची प्रत्यक्ष भेट घेता आली.

स्वतःच्या कमाईतून लेकरांसाठी खाऊ

बंदीजनांनी कारागृहाच्या उपहारगृहातून स्वतःच्या वेतनातून बिस्कीट, चॉकलेट आणि अन्य खाऊ खरेदी करून मुलांना प्रेमाने दिला. कारागृह प्रशासनाकडूनही मुलांसाठी पुलाव आणि शिरा असा अल्पोपहार देण्यात आला. मुलांसमोर आल्यानंतर बंदीजनांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत अश्रू असे संमिश्र भाव दिसून आले. काही मुलांनी वडिलांना घट्ट मिठी मारली, तर काहींना भावना व्यक्त करताना शब्दही फुटत नव्हते. काही काळासाठी कारागृहातील कठोर वातावरण विरघळून पालक आणि लेकरांच्या नात्याचा मायेचा ओलावा जाणवत होता.

अधीक्षकांनी घेतली आस्थेने विचारपूस

कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अधीक्षक चिंतामणी यांनी उपस्थित बंदीजन व त्यांच्या मुलांशी संवाद साधत आस्थेने विचारपूस केली. या उपक्रमासाठी ‘वऱ्हाड’ या अशासकीय सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले. संस्थेच्या सहकार्याबद्दल अधीक्षक  कीर्ती चिंतामणी यांनी आभार व्यक्त केले.

पुनर्वसनाला मायेचा स्पर्श

कारागृहातील शिक्षा ही केवळ बंदिस्त ठेवण्यापुरती मर्यादित नसून बंद्यांच्या मानसिक पुनर्वसनालाही महत्त्व आहे. कुटुंबाशी असलेले भावनिक नाते टिकवून ठेवणे या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. ‘गळाभेट’ उपक्रमातून बंदीजनांना मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला, तर मुलांनाही पालकांच्या प्रेमाचा अनुभव घेता आला. कार्यक्रमाला वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, राजेंद्र राठोड, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, हेमंत इंगोले, कारागृह शिक्षक संजय घोलप, ललित मुंडे, लिपीक पद्मजा वैद्य यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘वऱ्हाड’ संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, सोशल वर्कर मनोज गायकवाड, सौम्यकांत सिंग, जया खरडे, प्रियंका घुरड, अनुष्का काळे, गौरव कुमरे, नामदेव सोनोने तसेच शासकीय बालगृहाचे समुपदेशक प्रशांत विघ्ने आणि होली क्रॉस बालगृहाच्या  दीपा किस्पोटा यांचीही उपस्थिती होती. उंच भिंतींनी शरीरांना दूर ठेवले असले, तरी रक्ताच्या नात्यांतील माया मात्र दूर करू शकली नाही. रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेली ही ‘गळाभेट’ बंदीजनांसाठी काही क्षणांची भेट नव्हती, तर मायेचा, आशेचा आणि कुटुंबाशी जोडलेल्या नात्याचा अमूल्य क्षण ठरली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…