तिवसा,राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा येथील प्रख्यात साहित्यिक, कथाकार व विचारवंत डॉ. रवी दलाल यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्यसेवेबद्दल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे तिवसा, अमरावती जिल्हा तसेच संपूर्ण मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.
डॉ. रवी दलाल यांनी आजपर्यंत काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या आणि वैचारिक ग्रंथांसह जवळपास ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर ठसा उमटवला असून साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हरियाणा विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. डॉ. दलाल यांच्या ‘दंगल’ या कथेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली होती. या कथेला सात देशांमधून प्रथम क्रमांकाचा मान प्राप्त झाला होता. तसेच त्यांच्या ‘नामा’ या कादंबरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून याच साहित्यकृतीच्या आधारे त्यांना नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार लंडनच्या प्रख्यात संशोधक व लेखिका डॉ. लुसिया हेन्री यांच्या वतीने पुणे येथे प्रदान करण्यात आला. तसेच London Herald International Maxim या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या मुखपृष्ठावर प्रथमच एका मराठी लेखकाला स्थान देत डॉ. रवी दलाल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वारगेट येथे उत्साहात पार पडला. तिवसा सारख्या ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात जागतिक स्तरावर ठसा उमटवणाऱ्या डॉ. रवी दलाल यांच्या या यशाबद्दल साहित्यप्रेमी, वाचक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मराठी साहित्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या डॉ. रवी दलाल यांचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


