अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (प्रतिनिधी ): अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहादरम्यान काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, सांप्रदायिक कीर्तन तसेच अन्नदानाचे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सप्ताहातील दशमीच्या दिवशी रात्री पैठण निवासी व शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन झाले. संत एकनाथ महाराजांच्या ‘संताद्वारी कुत्रा झालो’ या अभंगावर त्यांनी रसाळ व भावपूर्ण विवेचन केले. यावेळी बोलताना ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी म्हणाले, “मोठी माणसे, विद्वान आणि ज्ञानी लोक स्वतःला नेहमी लहान समजतात आणि तसेच आचरण करतात. म्हणूनच ते मोठे होतात. संत एकनाथ महाराज ज्ञान, अधिकार आणि संपत्तीने महान होते. त्यांनी अफाट ग्रंथलेखन केले; मात्र त्यांनी स्वतःला नेहमी लहान मानले.” संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत कान्होपात्रा आणि संत जनाबाई यांच्या जीवनातूनही नम्रतेचा हाच संदेश मिळतो, असे त्यांनी सांगितले. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ या संतवचनाचा दाखला देत नम्रता हीच संतांच्या जीवनाची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देऊळगाव सिद्धीची भूमी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सुरेगाव येथे समाधिस्त असलेल्या वारकरी संप्रदायातील महान विभूती दंडी संन्यासी परमहंस परिव्राजकाचार्य प.पू. सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची श्रद्धा ग्रामस्थांमध्ये आहे. याच परंपरेत गावात गेल्या अनेक दशकांपासून दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी प.पू. ह.भ.प. पाटील काका, आळंदी तसेच ‘ज्ञानेश्वरी कंठभूषण’ ह.भ.प. पांडुरंग महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडला. भागवताचार्य डॉ. ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ, ह.भ.प. पांडुरंग महाराज क्षीरसागर, ह.भ.प. कैलास महाराज येवले, ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर, ह.भ.प. नरहरी महाराज सांगळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे, ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी, ह.भ.प. लक्ष्मण शास्त्री कदम तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांच्या कीर्तन व प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. देऊळगाव सिद्धी ग्रामस्थांनी उदार हस्ते अन्नदान तसेच देणगी देत सप्ताह सोहळा भक्तिमय केला. गावासह परिसरातील हजारो महिला-पुरुष भाविकांनी कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.


