मुंबई : भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. बाजार नियामक SEBI ने नवीन नियम लागू केला असून, आता शेअर बाजारातील क्लोजिंग प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राहणार नाही. विशेषतः फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) अंतर्गत येणाऱ्या शेअर्सच्या व्यवहारावर या बदलाचा थेट परिणाम होणार आहे.
पूर्वी शेअर बाजार दुपारी 3:30 वाजता बंद होत होता. मात्र आता बाजारातील व्यवहार तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहेत. F&O शेअर्सचा नियमित व्यवहार दुपारी 3:15 वाजता बंद होईल. त्यानंतर शेअर्सची अंतिम किंमत निश्चित करण्यासाठी विशेष क्लोजिंग ऑक्शन सेशन (CAS) सुरू केले जाणार आहे.
क्लोजिंग ऑक्शन सेशनमध्ये काय होणार?
दुपारी 3:15 ते 3:20 या वेळेत नवीन मार्केट ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यानंतर 3:20 ते 3:25 दरम्यान गुंतवणूकदारांना मार्केट आणि लिमिट ऑर्डर देण्याची संधी मिळेल. शेवटच्या 5 मिनिटांत म्हणजेच 3:25 ते 3:30 दरम्यान केवळ लिमिट ऑर्डर स्वीकारल्या जातील. या प्रक्रियेमुळे शेअरची अंतिम किंमत अधिक अचूक पद्धतीने निश्चित होण्यास मदत होणार आहे.
शेअरच्या अंतिम किमतीतील चढ-उतार कमी होणार
बाजार बंद होण्याच्या शेवटच्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदी-विक्रीमुळे शेअरच्या किमतींमध्ये अचानक बदल होत होते. नवीन लिलाव प्रणालीमुळे सर्व खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या ऑर्डर्स एकत्रित करून योग्य किंमत निश्चित केली जाणार आहे. या बदलाचा फायदा म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होण्याची शक्यता आहे. कारण शेअर्सची क्लोजिंग किंमत ही पोर्टफोलिओ मूल्य, निफ्टी-सेंसेक्स हालचाल आणि फंडांच्या NAV साठी महत्त्वाची असते.
इंट्राडे ट्रेडर्ससाठी महत्त्वाचा बदल
नवीन नियमांमुळे इंट्राडे (MIS) ट्रेड करणाऱ्या गुंतवणूकदारांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. CAS अंतर्गत येणाऱ्या शेअर्समध्ये ब्रोकरकडून इंट्राडे पोझिशन लवकर बंद केली जाऊ शकते. SEBI च्या या निर्णयाचा उद्देश बाजारातील शेवटच्या वेळेतील अनावश्यक चढ-उतार कमी करणे आणि व्यवहार अधिक पारदर्शक करणे हा आहे.


