ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात अखेर नरभक्षी ठरलेल्या T-120 वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले आहे. मात्र या कारवाईनंतर तिचे सुमारे १० महिन्यांचे चार बछडे आईपासून दूर झाले असून त्यांना सुरक्षितपणे पकडण्याचे मोठे आव्हान आता वन विभागासमोर उभे आहे.
दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील हळदा आणि आवळगाव परिसरात काही दिवसांपूर्वी रानभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या अनिल दिवटे यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याआधीही या वाघिणीच्या हल्ल्यात दोन ते तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाने यापूर्वीही या वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती गाभण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी ती चार बछड्यांसह दिसून आली. बछडे लहान असल्यामुळे त्यावेळीही कारवाई टाळण्यात आली होती. दरम्यान, या वाघिणीने अनेक पाळीव जनावरांवरही हल्ले केल्याची नोंद आहे.
अनिल दिवटे यांच्या मृत्यूनंतर वन विभागाने पुन्हा मोहीम सुरू केली. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत सततचा पाऊस आणि इतर अडथळ्यांमुळे विलंब झाला. अखेर २९ जुलै रोजी हळदा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २२२ मध्ये शूटर अजय मराठे यांनी डार्ट गनच्या साहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षितपणे जेरबंद केले. आता या वाघिणीचे चार बछडे जंगलात असून त्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन विभागाचे विशेष पथक प्रयत्न करत आहे. STPF, PRT सदस्य, RFO आणि वन विभागाचे सुमारे ५० अधिकारी-कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे.
सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) अरविंद जे. यांनी सांगितले की, PCCF यांच्या परवानगीनंतर वाघिणीला जेरबंद करण्यात आले असून, बछड्यांनाही पकडून DCF ब्रम्हपुरी यांच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत नागरिकांवर हल्ले करणारे २८ नरभक्षी वाघ चंद्रपूरमधील TTC सेंटर आणि इतर वनपरिक्षेत्रांमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सहा बछडे, चार नर आणि तीन मादी वाघांचा समावेश आहे. जागेअभावी काही वाघांना इतर जिल्ह्यांतील TTC केंद्रात हलवण्यात आले आहे. नरभक्षी वाघिणीला पकडणे ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कारवाई असली, तरी तिच्या चार बछड्यांचे आईपासून झालेले विभक्त होणे ही या संपूर्ण घटनेची सर्वात हळवी बाजू ठरली आहे. मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.


