नांदेड , रविन्द्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : पावसाळ्याच्या आगमनाने नांदेड–भोकर रोडवरील सीताखंडी परिसराने हिरवाईची शाल पांघरली आहे. डोंगररांगांवर पसरलेली दाट हिरवळ, त्यावर अलगद विसावलेले ढग आणि काळ्याभोर आभाळातून बरसणाऱ्या पावसाची चाहूल… निसर्गाने जणू या परिसराला नव्याने सजवले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा फुललेली वनराई, हिरव्यागार टेकड्या आणि पावसाळी वातावरणात खुलून दिसणारे निसर्गरम्य दृश्य मनाला सुखावून जाते. वाटसरूंचे लक्ष वेधून घेणारा हा परिसर सध्या निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक सुंदर ‘फोटो फ्रेम’ ठरत आहे.
हिरवाईच्या कुशीत उभारलेले छोटेसे निवांत ठिकाण, रंगीबेरंगी छत्र्या आणि पार्श्वभूमीला डोंगररांगांवर दाटलेले ढग—या साऱ्यांनी सीताखंडीच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. पावसाच्या सरींनी धुतलेला निसर्ग आणि ढगांच्या सावलीत चमकणारी हिरवाई, क्षणभर का होईना, धावपळीच्या जगापासून दूर घेऊन जाते. सीताखंडीचा हा पावसाळी निसर्ग म्हणजे हिरवाई, ढग आणि डोंगर यांचा मनमोहक संगम…


