चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव तथा ‘बहुजन समता पर्व’चे मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे यांनी स्वार्थापोटी राजकीय निष्ठा बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील विचारधारेचा वारसा असलेल्या बौद्ध समाजात वैचारिक व सांस्कृतिक जागृती उत्तम असली, तरी राजकीय समज आणि बेरजेचे राजकारण कमकुवत आहे. केवळ वैयक्तिक आमिषांना बळी पडून वारंवार राजकीय निष्ठा बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण समाजाच्या राजकीय प्रवासावर आणि प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची तीव्र उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
आपल्या राजकीय प्रवासाची पार्श्वभूमी मांडताना डॉ. कांबळे म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून ते काँग्रेस पक्षात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस संघटना मजबूत करण्याचे काम केले. महानगरपालिका निवडणुकीच्या निवड समितीत स्वत:ची संपूर्ण पत, प्रतिष्ठा आणि वेळ पणाला लावून त्यांनी विनोद लाभणे, महानंद वाळके, आकाश मानकर, करिश्मा जंगम आणि हनुमान चौके या पाच उमेदवारांना तिकीट मिळवून दिले व स्वखर्चाने प्रचार करून त्यांना निवडूनही आणले.
निवडणुकीनंतरच्या घोडेबाजारीत आदिवासी आणि ख्रिश्चन समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या तत्त्वांवर ठाम राहत तटस्थ भूमिका घेतली; मात्र बौद्ध समाजातील तीन लोकप्रतिनिधी दररोज राजकीय निष्ठा विकत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. ज्या माणसाने स्वत:चे पैसे व पत लावून निवडून आणले, त्यांच्याशीच जर हे प्रतिनिधी प्रतारणा करत असतील, तर ते सामान्य जनतेचे काय भले करणार? अशा संधीसाधूंमुळे संपूर्ण समाजाची मान खाली जात आहे. म्हणूनच, ज्यांनी निवडून आणले त्यांच्याशीच बेईमानी करणाऱ्या अशा संधीसाधू लोकप्रतिनिधींना सामान्य मतदारांनी व जनतेने थेट जाब विचारावा, असे आवाहन डॉ. दिलीप कांबळे यांनी केले.


