अमरावती, राज माहोरे प्रतिनिधी : अंजनगाव सुर्जी येथील संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकाच्या विकास आराखड्यासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील ५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विनंतीवरून गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या विकासासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर केला होता. या आराखड्याला बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. स्मारकाची निर्मिती, पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा, परिसराचे सुशोभीकरण आणि संबंधित विभागांच्या अभिप्रायांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच उच्चाधिकार समितीची मान्यताही देण्यात आली.
या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सभामंडप, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत आणि एसटीपी यांसह ८ हजार ८०१ चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात चंद्रभागा इमारत, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानासाठी १३ कोटी रुपये खर्च करून ३ हजार ७८८ चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय संत रुपलालजी महाराजांचा पुतळा, दोन अतिरिक्त पुतळे, रस्ता आणि पुलाच्या कामांसाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
दरम्यान, स्मारकासाठी जागेचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेली कृषी विभागाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, वित्त विभाग, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास व पर्यटन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्मारकाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद : डॉ. संजय कुटे
बारी समाजासह परिसरातील इतर समाजांचे आराध्य दैवत असलेल्या संत रुपलालजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पहिल्या टप्प्यातील ५० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केली.


