नांदेड (विशेष प्रतिनिधी) : हिंगोली गेट परिसरातील ‘खालसा फायनान्स’च्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असली, तरी खालसा फायनान्सचा मालक मात्र अद्याप फरार आहे. त्यामुळे त्याला नेमके पाठबळ कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास माळकौठा येथील मारुती मंदिराजवळून दोन अनोळखी व्यक्तींनी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील खालसा फायनान्सच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर फायनान्सच्या कार्यालयातच त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १४०(१), १४०(२), १४२, १२७(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या प्रकरणातील आरोपी जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड (व्यवसाय : खाजगी नोकरी, रा. गोपाळ चावडी), शेख अमीर शेख साहेब हुसेन (रा. देगलूर नाका) आणि इमरान खान शाहवाज खान (रा. गोवर्धन घाट) या तिघांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खालसा फायनान्सच्या कार्यालयाला कुलूप लावले आहे. अल्प रकमेच्या कर्जासाठी खालसा फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला गावातून उचलून कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फायनान्स मालकाला पाठबळ कोणाचे?
खालसा फायनान्स कंपनीच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून वेळोवेळी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या फायनान्सच्या मालकाविरोधात अनेक गुन्हेही पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सांगितले जात आहे. तरीही या फायनान्सच्या मालकाला पोलिसांची एवढी सहानुभूती का मिळते? आणि त्याला नेमके पाठबळ कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर फायनान्सचा मालक आर्थिक दबाव टाकत असल्याने पोलीसही वेळोवेळी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात रंगत आहे.


