शेगाव , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : शहरातील गजबजलेल्या परिसरातील योगीराज हॉटेलमध्ये भरदिवसा थरारक घटना घडली. काही कथित गुंडांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली, खंडणीची मागणी केली आणि “हॉटेल खाली करा, नाहीतर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, अनेक वर्षे बंद असलेले योगीराज हॉटेल काही व्यावसायिकांनी लेखी करार करून भाडेतत्त्वावर घेतले होते. लाखो रुपयांची गुंतवणूक करून हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले आणि अल्पावधीतच व्यवसाय तेजीत आला. मात्र हॉटेल सुरू झाल्यानंतर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद निर्माण झाला. करार अस्तित्वात असतानाही हॉटेल खाली करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाडेकरूंकडून करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये घुसून दहशत
पीडितांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी काही कथित गुंड हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, साहित्याची तोडफोड केली आणि खंडणीची मागणी केली. तसेच “हॉटेल खाली करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेमुळे हॉटेलमधील कर्मचारी, ग्राहक आणि परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
112 वर कॉल; पोलिस उशिरा पोहोचल्याचा आरोप
घटना सुरू असतानाच 112 आपत्कालीन सेवेला संपर्क साधण्यात आला होता. मात्र सर्व प्रकार घडून गेल्यानंतरच पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि तत्परतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमुळे कारवाईची मागणी
घटनेचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगितले जात असून, या आधारे संबंधित गुंडांवर खंडणी, मारहाण, धमकी आणि तोडफोडीचे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
व्यावसायिकांमध्ये संताप
शेगावसारख्या धार्मिक आणि व्यापारी शहरात अशा प्रकारे व्यावसायिकांना लक्ष्य करून दहशत निर्माण केली जात असेल तर उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होईल, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


