नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेडच्या सहकार्याने श्री नवयुवक दुर्गा माता मंडळाच्या वतीने ‘शक्तीपीठ ते भक्तीपीठ – नारीशक्ती संवाद’ या उपक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार तथा भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, आमदार श्रीजयाताई चव्हाण, महापौर सौ. कविता संतोष मुळे, भाजयुमोच्या राज्य युवती प्रमुख तथा नगरसेविका शांभवी साले, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका ज्योती कल्याणकर, सौ. मृणाल राजूरकर, माजी महापौर मंगलाताई निमकर व सौ. मोहिनी येवनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांनी महिलांशी संवाद साधला. महिला सक्षमीकरण, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांची क्षमता, त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि कर्तृत्वाला अधिकाधिक संधी मिळावी, तसेच त्यांच्या सहभागातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.
कार्यक्रमाला नांदेड महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सदिच्छा सोनी पाटील, सौ. सुमती व्याहाळकर, सुषमा थोरात पंडित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, सौ. विनया तेहरा, धनश्री कुलकर्णी यांच्यासह पक्षाच्या विविध महिला सेलच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


