विश्वविक्रमी शंखनादाने दुमदुमला गोदाकाठ

अमेरिकेचा विक्रम मोडीत काढत ५१७ वादकांचा सामूहिक शंखध्वनी; आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची भक्तिमय वातावरणात नांदी

नाशिक (प्रतिनिधी) : शेकडो शंखांमधून एकाच वेळी निनादणारा दिव्य ध्वनी, गोदाकाठावर निर्माण झालेले भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरण तसेच ‘जय श्रीराम’, ‘जय जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने उंचावलेला नाशिककरांचा अभिमान अशा अभूतपूर्व आणि मंगलमय वातावरणात नाशिकने जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण आणि गोदावरीच्या पवित्र तीरावर आयोजित भव्य सोहळ्यात तब्बल ५१७ शंखवादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. यापूर्वी अमेरिकेच्या नावे असलेला ३०३ शंखवादकांचा जागतिक विक्रम मोडीत काढत नाशिकने नवा इतिहास रचला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीची ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नांदी ठरली.

भक्ती, शिस्त आणि श्वासांच्या लयबद्धतेचा अद्भुत संगम

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजेपासूनच गोदातीरावर शंखवादक, साधू-महंत आणि नागरिकांची अफाट गर्दी जमू लागली होती.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या कडक निकषांनुसार सहभागींची नोंदणी, तांत्रिक पडताळणी आणि निरीक्षण पार पडले. शंख वाजवणे हे केवळ धार्मिक कार्य नसून प्राणायाम, श्वासांवरील नियंत्रण आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा असते. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जेव्हा ५१७ वादकांनी एकमुखाने शंख फुंकले, तेव्हा संपूर्ण परिसर एका अलौकिक ऊर्जेने आणि प्रसन्नतेने न्हाऊन निघाला. पाठोपाठ झालेल्या भव्य गोदा आरतीने वातावरणातील मांगल्यात आणखी भर घातली.

‘अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे,’ अशी घोषणा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी करताच उपस्थितांमध्ये जल्लोष झाला. टाळ्यांचा कडकडाट आणि ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी गोदाकाठ दुमदुमून गेला.

भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव : पालकमंत्री गिरीश महाजन

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, लोकप्रतिनिधी, प्राधिकरणाचे व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, साधू-महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, “हा जागतिक विक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक लौकिकात भर घालणारा आहे. भारतीय परंपरा आणि सामूहिक शक्तीचे दर्शन या सोहळ्यातून जगाला झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराचा सोहळा असून, येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आदरातिथ्य करणे हे आपले कर्तव्य आहे.”

३१ ऑक्टोबरला रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण

आगामी कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०२ वाजता रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात विश्वविक्रम रचणारा हाच शंखवादकांचा समूह शंखनाद करून मंगलारंभ करणार आहे. शंखनादाच्या या अभूतपूर्व निनादाने नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा उत्साह द्विगुणित केला असून, संपूर्ण शहर भक्ती आणि अभिमानाच्या रंगात रंगून गेले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…