चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांना समजून घेणे, त्यांच्या भावनिक गरजा ओळखणे आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणाची चार वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असून, या काळात त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचा योग्य उपयोग आणि आर्थिक स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गडचिरोली येथील NIRMAN संस्थेचे प्रोग्राम डायरेक्टर अमृत बंग यांनी केले.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय प्राध्यापक अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालय आणि NIRMAN संस्थेदरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. आर. के. धात्रक, NIRMAN संस्थेचे प्रोग्राम डायरेक्टर अमृत बंग, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अदिती पिदुरकर, प्रोजेक्ट असोसिएट इशिता लाडे, विक्रांत कुठे, मेघा शिंदे आणि अधिष्ठाता डॉ. बिरेश्वर गांगुली यांची उपस्थिती होती.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देणे आणि सकारात्मक व प्रगतीशील शिक्षणाचे वातावरण निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व परिचय सत्र पार पडले. त्यानंतर NIRMAN संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्राध्यापकांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मार्गदर्शन करताना अमृत बंग यांनी भारतीय युवकांची सद्यस्थिती, त्यांच्यासमोरील विविध आव्हाने आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी वेळेचा सकारात्मक उपयोग करून शिक्षणासोबत स्वावलंबनाची वृत्ती जोपासावी. आर्थिक स्वावलंबन हे सक्षम आणि जबाबदार जीवनासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या विकासाचे विविध टप्पे, त्यांच्या विचारांमध्ये व वर्तनामध्ये होणारे बदल आणि त्यांच्या क्षमतांचा विकास याविषयी त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन केवळ शैक्षणिक गुणांच्या आधारे न करता त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांच्या विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
विद्यार्थ्यांना समजून घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि योग्य वेळी मार्गदर्शन करणे ही शिक्षकांसह पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल तसेच त्यांच्या आवडी-निवडी आणि कौशल्यांना वाव मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी विविध पिढ्यांमधील अंतर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा व आव्हाने समजून घेणे, भावनिक जागरूकता विकसित करणे, स्वतःला व इतरांना समजून घेणे, ध्यानधारणेचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन आणि कार्य-जीवन संतुलन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. वर्षा सादरानी यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


