वाघ-बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा रात्रीचा ‘वीज’ पहारा!

संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी; महावितरण व वनविभागाला शेतकऱ्यांचे निवेदन

तिवसा ,राज माहोरे( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांच्या वावराच्या घटना समोर येत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवसा तालुक्यातील विविध भागांतही बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळून येत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत देण्यात यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी महावितरण व वनविभागाकडे निवेदन दिले.

तिवसा तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघ-बिबट्यांच्या वावराच्या बातम्या समोर येत आहेत. तिवसा भाग-३ ते डेहणी मार्गावरील गुलाबराव विनायकराव मुंदाने यांच्या शेतापासून विशाल ठाकरे यांच्या शेतापर्यंतच्या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आल्याची माहिती मंगेश मानमोळे यांनी दिली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

अनेक शेतकरी व शेतमजूर रात्रीच्या वेळी शेतातच वास्तव्यास असतात. काही ठिकाणी पाळीव जनावरे तसेच शेतीची यंत्रसामग्रीही शेतात असते. मात्र रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण परिसर अंधारात जातो. अशा परिस्थितीत बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांचा अचानक सामना झाल्यास शेतकरी, शेतमजूर, रखवालदार तसेच पाळीव जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी

वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO), वनविभाग तिवसा यांनाही निवेदन दिले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटनांची तातडीने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शेतांमध्ये पाळीव जनावरे, रखवालदार व त्यांची कुटुंबे वास्तव्यास असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वनविभागाने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरात वनकर्मचाऱ्यांची नियमित गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

वन्यप्राण्यांचा वावर निश्चित करण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप व इतर आवश्यक उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. महावितरणने शेतकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी नितीन मेहेकरे, भूषण मुंदाने, प्रणव मुंदाने, प्रवीण खुळे, मंगेश मानमोळे, भोजराज गंधे, मुकुंद मेहेत्रे, किशोर गौरखेडे आदी शेतकरी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…