चांदूरबाजार, राज माहोरे( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात मागील काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाने सोमवारी सायंकाळी जेरबंद करण्यात यश मिळविले. सोनोरी गावातील १७ वर्षीय तरुणी उर्मिला बाजीराव इवणे हिचा बळी घेतल्यानंतर या वाघाने शिरजगाव कसबा परिसरात पुन्हा धुमाकूळ घातला. शेतात काम करीत असलेल्या दिनेश आवारे (वय ४६) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला. सलग दोन मानवी बळी गेल्याने परिसरात संताप, भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरजगाव कसबा येथील घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली. नागरिकांच्या वाढत्या आक्रोशाची दखल घेत वनविभागाने शोधमोहीम अधिक तीव्र केली. मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी, विशेष शूटर, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. दरम्यान, भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी सकाळपासून संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवले होते. त्यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याशी सातत्याने संपर्क साधून वाघाला तातडीने पकडण्याबाबत चर्चा केली. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
वनविभागाच्या पथकाने दिवसभर जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. वाघाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. अखेर पावर हाऊस परिसरालगत वाघाचा ठावठिकाणा लागल्यानंतर ट्रँक्युलायझर गनद्वारे गुंगीचे औषध देण्यात आले. काही वेळातच वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. वाघ जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मागील काही दिवसांपासून भीतीच्या छायेखाली असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, घटनास्थळी पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच जंगलालगतच्या भागात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
घटनाक्रम एका नजरेत
सोनोरी येथे १७ वर्षीय उर्मिला इवणे हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.
शिरजगाव कसबा येथे दिनेश आवारे (४६) यांचा बळी.
सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण.
ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश; वाघाला जेरबंद करण्याची मागणी.
नवनीत राणा यांचा वनविभागाशी सातत्याने संपर्क.
विशेष शूटर व वनविभागाच्या पथकाची दिवसभर शोधमोहीम.
ट्रँक्युलायझरद्वारे वाघाला जेरबंद करण्यात यश.
ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास.
नागरिकांना वनविभागाचे आवाहन
जंगल परिसरात एकटे जाऊ नये. सकाळ-सायंकाळ शेतात काम करताना समूहाने जावे. वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


