वाघिणीच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; वन्यजीवप्रेमींचे मुंडन आंदोलन

“वाघिणीच्या मृत्यूला जबाबदार कोण?” वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाघिणीचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. वाघिणीच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी मुंडन आंदोलन करत वन विभागाविरोधात संताप व्यक्त केला.

वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम सुरू होती. अखेर चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा शिवारात वन विभागाच्या पथकाने ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.मात्र, जेरबंद केल्यानंतर उपचारासाठी वन्यजीव बचाव केंद्राकडे नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ट्रँक्विलायझेशन प्रक्रियेत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, औषधाचा डोस योग्य होता का, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. ट्रँक्विलायझेशनदरम्यान प्रमाणापेक्षा अधिक डोस दिल्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाला का, असा संशय वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर वाघिणीला जेरबंद करणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर तिची सुरक्षित हाताळणी आणि उपचार याबाबतही तितकीच गंभीरता अपेक्षित होती, असे वन्यजीवप्रेमींनी म्हटले आहे. चौकशी पारदर्शकपणे न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…