मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेता रणवीर सिंह नुकताच पोहोचला. यावेळी त्याने व्हीआयपी रांगेतून बाप्पाच्या चरणी जाऊन दर्शन घेतले. रणवीरने बाप्पाच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतला. सध्या तो आगामी ‘प्रलय’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’मधून मिळालेल्या यशानंतर पुढील वाटचालीसाठी रणवीरने यंदाही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
रणवीर सिंह लालबागच्या परिसरात पोहोचताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी त्याने हात मिळवला, त्यांच्याकडे हसून पाहिले आणि गर्दीतून वाट काढत पुढे गेला. रणवीरशी हात मिळवता आल्याने अनेक भाविकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला. रणवीरचा चाहत्यांशी संवाद साधण्याचा हा अंदाज सोशल मीडियावर चर्चेत आहे. पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजम्यात आलेल्या रणवीरचा भाविकांशी मनमोकळेपणाने संवाद साधतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचा हा साधेपणा आणि चाहत्यांशी असलेला आपलेपणा अनेकांना भावला आहे.
दरम्यान, रणवीर सिंहच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण आहे. पत्नी दीपिका पादुकोणसोबत त्याच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे वृत्त आहे. त्यांची मुलगी दुआ सध्या दोन वर्षांची आहे. दुसरीकडे, रणवीरच्या करिअरमध्येही ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’नंतर महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. मात्र, ‘डॉन ३’मुळे रणवीर आणि फरहान अख्तर यांच्यातील संबंधांबाबतही चर्चा झाली होती. रणवीरने चित्रपटाच्या शूटिंगच्या काही दिवस आधी ‘डॉन ३’ सोडल्याचे वृत्त होते. त्यानंतर फरहानकडून नुकसानभरपाईची मागणी केल्याचेही सांगितले गेले.


