यवतमाळ: जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत उद्धवबाबा मंदिरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि चांदीच्या मौल्यवान वस्तूंसह दानपेटीतील रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिरातील सुमारे साडेपाच किलो चांदीच्या धार्मिक वस्तू आणि दानपेटीतील सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरी झालेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे चार लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी मंदिरात पूजा-अर्चनेसाठी आलेल्या भाविकांना मंदिराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर ही बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंदिरात झालेल्या या चोरीमुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्रद्धास्थानालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, दारव्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


