मुंबई : राज्यात सध्या पावसाचं चित्र विरोधाभासी दिसून येत आहे. एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह राज्यातील ११ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावरही जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात प्रवास करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भाच्या इतर भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नागपूर जिल्ह्यात १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान ४८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल २१ टक्के कमी आहे. गेल्या बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना पाण्याची गरज भासत आहे. संपूर्ण विदर्भातही पावसाची तूट १३ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर असला, तरी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.


