भक्तिरसात रंगला शिवमहापुराण कथेचा सांगता सोहळा

संगीतमय निरूपणातून भगवान शिवाच्या भक्ती, त्याग आणि सदाचाराचा संदेश

नांदेड, रविंद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : शहरातील गणेशनगर येथील श्री गणेश मंदिरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेची सांगता श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माच्या वातावरणात झाली. शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शिवाचे महात्म्य, भक्तीची शक्ती तसेच मानवी जीवनाला दिशा देणारे विचार यांचे रसाळ आणि भावपूर्ण निरूपण यावेळी करण्यात आले.

संगीतमय समर्थ भक्त श्री. राघवेंद्र महाराज देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने शिवमहापुराणातील कथाभाग भाविकांसमोर सादर केला. त्यांच्या कथनाला भावपूर्ण संगीताची साथ लाभल्याने संपूर्ण परिसर शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. तबल्यावर आदित्य उपाध्ये आणि पेटीवर दत्तात्रय वर्तक यांनी सुरेल साथ दिली. कथा, अभंग, भजन, श्लोक आणि संगीताच्या माध्यमातून भाविकांना भगवान शिवाच्या स्वरूपाचे आध्यात्मिक दर्शन घडले. शिवमहापुराण हे केवळ पुराणकथांचे संकलन नसून मानवी जीवनाला मूल्यांची दिशा देणारा आध्यात्मिक ग्रंथ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अहंकाराचा त्याग, सत्याचा मार्ग, संयम, परोपकार, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व कथेतून अधोरेखित करण्यात आले. भगवान शिव हे केवळ संहाराचे प्रतीक नसून अहंकाराचा संहार करून कल्याणाचा मार्ग दाखविणारे देव असल्याचा संदेश देण्यात आला. शिवमहापुराण ग्रंथात सहा संहिता, चौदा खंड आणि सुमारे २४ हजार श्लोक असल्याचे सांगत, त्यातील कथांचा बोध दैनंदिन जीवनात आचरणात आणल्यास जीवनाला सकारात्मक दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन करण्यात आले. जगभरातील शिवमंदिरे आणि ज्योतिर्लिंगे ही श्रद्धेची आणि अध्यात्माची केंद्रे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कथेच्या अंतिम टप्प्यात भक्तिमय वातावरण अधिकच उत्कट झाले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी एकाग्रतेने कथा श्रवण करत आध्यात्मिक अनुभूती घेतली. सांगता प्रसंगी शिवमहापुराणाच्या श्रवणातून मिळालेली शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संगीत, कथा आणि भक्तीचा सुरेल त्रिवेणी संगम साधणारा हा शिवमहापुराण सांगता सोहळा भाविकांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला. श्रद्धेने भारावलेल्या वातावरणात ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कथेची भक्तिमय सांगता झाली. या कथेच्या आयोजनासाठी गणेश मंदिर समितीचे संचालक सतीश सामते, प्रविण चिद्दरवार, हर्षद पाटील, प्रा. सतीश पोतदार, पत्तेवार, तुप्तेवार, काप्रतवार, सतीश शिरूरकर, पाठक, कंकाळ, कुर्तडीकर तसेच गणेशनगर महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…