पुण्यात 26 मेपासून जमावबंदी; मोर्चे-सभांना बंदी, महापालिकेच्या वाहन वापरावरही निर्बंध

पुण्यात उद्या रात्रीपासून म्हणजेच 26 मेपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मोठ्या सार्वजनिक जमावांवर बंदी असणार आहे. यासोबतच महापालिकेच्या वाहनांच्या वापरावरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढते पेट्रोलियम दर लक्षात घेऊन पंतप्रधान Narendra Modi यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने खर्च नियंत्रणासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार कार्यालयीन कामासाठी वाहनांचा वापर अत्यावश्यक असेल तेव्हाच करावा, अनावश्यक फेऱ्या टाळाव्यात आणि एका ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘कार पुलिंग’चा अवलंब करावा. मंत्रालय, उच्च न्यायालय आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटी, रेल्वे, मेट्रो किंवा सार्वजनिक बसचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आठवड्यातील किमान एक दिवस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा, बैठका आणि प्रशिक्षण शक्यतो ऑनलाइन घ्यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या वाहनांवर होणारा इंधन, देखभाल आणि चालकांचा वाढता खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, या निर्बंधांमुळे प्रत्यक्षात किती इंधन बचत होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…