नांदेड : नांदेड शहरात एकाच दिवसात झालेल्या दोन हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या हत्येची खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच दुपारच्या सुमारास सिडको परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सिडको परिसरातील एका दुग्धशाळेजवळ दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चंदन सिंग बावरी या तरुणाला अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घेरले आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ला अचानक झाल्याने चंदन सिंगला बचावाची संधी मिळाली नाही. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर शस्त्रे घेऊन तेथून पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. एकाच दिवसात दोन हत्यांच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण काय, आरोपी कोण आहेत आणि या घटनेचा पूर्वीच्या हत्येशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या हत्येचे कारण आणि आरोपींची माहिती स्पष्ट होणार आहे.नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.


