बदलापूर : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, तंबाखू, गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर सातत्याने कारवाई होत असून बदलापुरातही याची प्रचिती आली आहे.
बदलापूर पश्चिमेतील बस डेपो परिसरातील दोन टपऱ्यांवर एफडीए आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्या सील केल्या. तपासादरम्यान या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मते, बस डेपो परिसरात अशा पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याने युवकांवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याआधीही एफडीएने शिरगावातील फ्लिपकार्ट मिनिट्स या वितरण केंद्रावर एक्सपायरी डेट झालेल्या आणि खराब खाद्यपदार्थांच्या विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. तसेच पारसी डेअरी फार्मचा परवाना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आला होता.
दरम्यान, अकोला एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मिती कारखान्यावरही एफडीए व पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या या सलग कारवायांमुळे भेसळखोर आणि अवैध मार्गाने तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नियम मोडणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


