पुणे : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया यांचा एक वर्गमित्र या हत्येच्या कटाची माहिती आधीपासूनच असल्याचा संशय तपासातून समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू केली असून, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो चेतन चौधरी आणि सिया यांचा निकटचा वर्गमित्र असल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, खुनापूर्वी चेतन आणि सियाने केतन अग्रवालच्या हत्येच्या नियोजनाबाबत या तरुणाशी चर्चा केली होती. तसेच १८ जून रोजी केतनला लोहगडावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी त्याला सोबत येण्याचा आग्रहही केला होता. मात्र, वैयक्तिक कारणामुळे तो त्यांच्यासोबत गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
तपासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, लोहगडावर खून केल्यानंतर चेतन चौधरी थेट याच वर्गमित्राकडे गेल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे खुनानंतर आरोपींच्या हालचाली, त्यांच्यात झालेला संवाद आणि पुढील घडामोडींबाबत या तरुणाकडे महत्त्वाची माहिती असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.खुनाच्या कटाची माहिती असूनही संबंधित तरुणाने याबाबत पोलिसांना किंवा इतर कोणालाही माहिती का दिली नाही, तसेच खून झाल्यानंतर चेतन त्यालाच का भेटला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे.या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस संबंधित तरुणाला चौकशीसाठी बोलावण्याची तयारी करत असून, तपासात पुढे आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


