परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने वसमत रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाची महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
गणेश भक्तांना सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी महानगरपालिकेने कृत्रिम हौदाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षितता तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधांची पाहणी महापौरांनी केली. विसर्जनाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी अधिकारी व कर्मचार्यांकडून कृत्रिम हौदाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली. विसर्जन काळात परिसरात स्वच्छता राखण्यासह भाविकांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाहणीवेळी काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान, सदस्य सुनील देशमुख, विनोद कदम, पाणीपुरवठा अधिकारी शेख इस्माईल, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


