पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले रसायनशास्त्राचे प्रश्न NTAच्या अधिकृत प्रश्नसंचाशी मोठ्या प्रमाणात जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हे प्रश्न नीट परीक्षा होण्याच्या सुमारे दहा दिवस आधीच आरोपींकडे पोहोचल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
तपासात असेही उघड झाले की, मोटेगावकर यांचा मुलगा पी. व्ही. कुलकर्णी यांच्या ‘केमिस्ट्री ट्युटोरियल्स’ या क्लासमध्ये शिक्षण घेत होता. याच माध्यमातून प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या बदल्यात ५ लाख रुपये दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. फॉरेन्सिक तपासात मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये एकूण ३६ फोटो आढळले. त्यापैकी ५ फोटो डुप्लिकेट असल्याचे स्पष्ट झाले. या फोटोंमध्ये हाताने लिहिलेले १३२ केमिस्ट्रीचे प्रश्न होते. तपास अधिकाऱ्यांनी हे प्रश्न NTAच्या मास्टर प्रश्नसंचाशी पडताळून पाहिले असता त्यातील १११ प्रश्न तंतोतंत जुळल्याचे समोर आले.
मोबाईलच्या मेटाडेटातून आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला. हे फोटो ३ मे रोजी काढण्यात आले होते. म्हणजेच नीट परीक्षा होण्याच्या सुमारे दहा दिवस आधीच प्रश्न आरोपींकडे उपलब्ध झाले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, हे प्रश्न स्वतः मोटेगावकर यांनी लिहून घेतले होते. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा घटनांमुळे स्पर्धेची पारदर्शकता आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सीबीआयने या प्रकरणात पुणे, लातूर आणि इतर भागांतून आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून पेपरफुटीच्या जाळ्याचा तपास सुरू आहे. डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे.


