मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत त्यांना नोटीस बजावली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक घटनात्मक प्रक्रियेनुसार न झाल्याचा दावा केला आहे. ही निवड रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पुन्हा निवडणूक घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही नोटीस सुनेत्रा पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य मानावी, अशी भूमिका नोटीसमध्ये मांडण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत पक्षाची धुरा स्वीकारली होती. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. मात्र आता त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्याने या निवडीवर आक्षेप घेतल्याने अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी या नोटीसशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच झाल्याचा दावा करत, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे आवश्यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आता या नोटीसवर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


