परभणी, निलेश कामतीकर (जिल्हा प्रतिनिधी) : हिंदी भाषा ही एकात्मता, संस्कृती आणि भावनेचे प्रतीक असून ती समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य करते. भाषा ही संस्कृतीची वाहक असल्याने प्रत्येक भाषेचा आणि आपल्या मातृभाषेचा सन्मान राखत राष्ट्रीय ऐक्यासाठी हिंदीचा वापर वाढविणे आवश्यक आहे. भारतीय विविधतेला एकात्मतेने गुंफण्यासाठी हिंदी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात हिंदीचा वापर करून तिच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्रा. शिवदास शिंदे यांनी केले.
नानलपेठ येथील बाल विद्यामंदिर हायस्कूलमध्ये हिंदी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अरुण बोराडे होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. शिवदास शिंदे उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, हिंदी विभागप्रमुख प्रवीण सोनोने, कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदीचे प्रा. सिद्धेश्वर हलगे यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना प्रा. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत करण्याचे आवाहन केले. विविध भाषांमधून ज्ञान मिळविल्याने व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते. हिंदी साहित्याचे वाचन, हिंदी भाषेत लेखन आणि दैनंदिन व्यवहारात हिंदीचा वापर वाढविणे आवश्यक आहे. हिंदीचा प्रसार भारतापुरता मर्यादित नसून जगातील अनेक विद्यापीठांमध्ये तिचे अध्यापन केले जाते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य अरुण बोराडे यांनी हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषेसह हिंदी भाषेचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गोष्टरूपातून हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी ‘अ’च्या वतीने करण्यात आले. वर्गशिक्षक अतुल करमाळकर यांनी यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे केली. तसेच हिंदी साहित्य आणि साहित्यिकांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भित्तीपत्रके तयार केली. मान्यवरांच्या हस्ते या भित्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागप्रमुख प्रवीण सोनोने यांनी करून दिला. सूत्रसंचालन इफ्रा पठाण आणि नंदिनी काकडे यांनी केले, तर राधा कतारे हिने आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


