अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झालेली असून कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. परंतु पावसाची फक्त दोनच नक्षत्रे उत्तरा व हत्ती बाकी असताना अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे.
तालुक्यातील उत्तरेकडील भाग अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून विहिरींमध्ये पाणी राहिलेले नाही. शेतातील सोयाबीन, बाजरी, मका इत्यादी पिके करपण्याच्या मार्गावर असून त्यातून उत्पादन मिळेलच याची शाश्वती नाही.
जर परतीच्या पावसाने पाठ फिरवली तर सरकारने कृत्रिम पावसाचा विचार करावा, अशी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. असे शेतकरी पंडित गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग आत्तापासूनच करणे गरजेचे आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


