नागपूर, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे सेंटर पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर शासकीय कामकाज अधिक सुरक्षित, विश्वसनीय आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने सेंटरची उर्वरित कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
गड्डीगोदाम मेट्रो स्थानक येथे सुमारे १४ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची ॲड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत त्रिपाठी, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक संदीप बापट, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा प्रकल्प शासनाच्या विविध विभागांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत डेटा सेंटरची कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा
डेटा सेंटरच्या सुरळीत आणि अखंडित कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती मंत्री शेलार यांनी घेतली. सर्व्हर रूम, कंट्रोल रूम, विविध महत्त्वाचे कक्ष, इमर्जन्सी युनिट तसेच सुरक्षा व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.
सर्व्हर सातत्याने थंड ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कूलिंग सिस्टीमची तसेच त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता आणि पर्यायी व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखावा आणि कामाच्या गतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच पुढील प्रत्येक टप्प्यातील कामांचे नियोजन याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.


