तिवसा , रज माहोरे ( प्रतिनिधी ) : घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी सर्वसामान्य ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असतानाच तिवसा शहरातील राहुल इंडियन गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ग्राहकांना सांगितले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवीन एलपीजी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
या प्रकाराची चौकशी करून ग्राहकांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने तहसीलदार तिवसा यांना निवेदन देण्यात आले.
२५ दिवस की ४५ दिवस? ग्राहकांचा सवाल
निवेदनात नमूद केल्यानुसार, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने २५ मार्च २०२६ रोजी केलेल्या स्पष्टीकरणानुसार शहरी भागासाठी एलपीजी रिफिल बुकिंगची कालमर्यादा २५ दिवस, तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवस असल्याचे सांगण्यात आले आहे. तिवसा हे शहर असूनही येथील ग्राहकांना ४५ दिवसांची अट का लावली जात आहे, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या पुढील बुकिंगसाठी २५ दिवसांचे अंतर ठेवले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र, तिवस्यात ४५ दिवसांची अट लागू केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल इंडियन गॅस एजन्सी नेमक्या कोणत्या नियमाच्या आधारे ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी लागू करीत आहे, असा प्रश्न विचार मंचाने उपस्थित केला आहे.
नवीन कनेक्शनसाठीही ग्राहकांची धावपळ
दरम्यान, नवीन एलपीजी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या पात्र नागरिकांनाही कनेक्शन मिळविताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस ही अत्यावश्यक गरज असल्याने बुकिंग तसेच नवीन कनेक्शनच्या प्रक्रियेत ग्राहकांना अनावश्यक त्रास होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
तिवसा शहरातील ग्राहकांना लागू करण्यात आलेल्या ४५ दिवसांच्या नियमाचा अधिकृत आधार काय आहे, याची संबंधित विभागाने चौकशी करावी. नियम चुकीच्या पद्धतीने लागू केला जात असल्यास तो तातडीने दूर करावा आणि पात्र नागरिकांना नियमानुसार नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमर वानखडे, प्रशांत सुरोसे, रोशन ठाकरे, कुणाल राऊत, रामप्रभू गावंडे यांच्यासह विचार मंचाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
एजन्सीची भूमिका
“ग्राहकांनी व नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण व्हावे, ही आमचीही भूमिका आहे. या संदर्भात आमच्या एजन्सीकडूनही तहसीलदारांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप तहसीलदारांकडून याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. संबंधित प्रशासनाकडून मार्गदर्शन किंवा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.”
— हरिष गुल्हाने, मॅनेजर, राहुल इंडियन गॅस एजन्सी, तिवसा
प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी
“तिवसा शहरातील ग्राहकांना गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट लावली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी आहे. शहरी भागासाठी लागू असलेल्या नियमांनुसार ग्राहकांना सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच पात्र नागरिकांना नवीन गॅस कनेक्शन मिळण्यात अडथळे येत असतील तर तेही त्वरित दूर करावे.”
— अमर वानखडे, अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच तथा नगरसेवक, तिवसा


