पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : बोल बजरंग बली की जय…च्या जयघोषात बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी चौथ्या प्रयत्नात गोविंदांना हंडी फोडण्यात यश आले. विराज कांबळे या गोविंदाने हंडी फोडली.
बेलबाग चौकाजवळील जय गणेश प्रांगणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, प्रतिक घोडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भव्य एलईडी स्क्रीनवरून श्रीकृष्ण लीला दर्शन गोपाळभक्तांना झाले. राधेकृष्ण ग्रुपच्या गोविंदांनी हंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
‘मच गया शोर’, ‘बोल बजरंग बली की जय’ यांसारख्या पारंपरिक गाण्यांसह नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. सुरुवातीला नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आली होती, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.


