तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील एकूण १,०१,३३१ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी दुसरा गणवेश व बुटांपासून वंचित होते. १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना चपला घालून स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला होता. यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट रोजी तिवसा गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कार्यालयात अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसाठी तातडीने दुसरा गणवेश आणि बूट खरेदीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२६-२७ गणवेश योजनेंतर्गत गणवेश तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर २१ ऑगस्ट रोजी तिवसा दौऱ्यावर आले होते. यावेळी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ज्या पालकांनी स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी केले आहे, त्यांना खर्चाची भरपाई देण्यात यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साहित्याचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपये, तर त्यापैकी तिवसा तालुक्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसरा स्काऊट-गाईड गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, विद्यार्थ्यांना लवकरच दुसरा गणवेश मिळणार आहे.


