नांदेड, रविन्द्र औंढेकर (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माहूरगड येथील पवित्र श्री दत्तशिखर परिक्रमेचा गुरुवार, २७ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. अनादी काळापासून परंपरेने चालत आलेल्या ऐतिहासिक पंचक्रोशी परिक्रमेचा प्रारंभ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. परिक्रमेच्या निमित्ताने श्री दत्तशिखर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान तसेच विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी ४ वाजता देवस्थानचे महापुरुष व साधू-संत माहूर पीठाधीश्वर महंतांची आज्ञा व आशीर्वाद घेऊन सर्व तीर्थकुंडांचे पूजन करतील. कुंडातील पवित्र जल श्री दत्तप्रभूंना अर्पण केल्यानंतर, माहूर पीठाधीश्वर महंत डॉ. श्री श्री श्री १००८ श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सायंकाळी ६ वाजता परिक्रमेचा शुभारंभ होईल. शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी २५ किलोमीटरच्या या परिक्रमेेत साधू-संतांसह लाखो भाविक सहभागी होऊन परिसरातील २७ तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता सर्वतीर्थ कुंडाचे पूजन करून पवित्र जलासह श्री दत्तशिखर येथे महाआरती, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करण्यात येईल. शनिवारी सकाळी ६ वाजता काकड आरतीने परिक्रमेची विधिवत सांगता होणार आहे.
देवस्थानतर्फे सुविधा उपलब्ध
परिक्रमेच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दत्तशिखर देवस्थान व सेवाधारी भक्त परिवाराच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. परिक्रमेच्या मार्गावर भाविकांसाठी अखंड अन्नदान व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री दत्तात्रय शिखर संस्थान व व्यवस्थापक जी. एन. नाईक यांच्या वतीने सर्व भाविक-भक्तांनी या पवित्र परिक्रमेेत सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री दत्तशिखर संस्थानचे पीठाधीश्वर डॉ. धनेश्वर भारती महाराज यांनी परिक्रमेचे महत्त्व सांगताना या परिक्रमेेत ३३ कोटी देवी-देवता अदृश्य रूपाने सहभागी होतात, अशी श्रद्धा असल्याचे सांगितले. परिक्रमा केल्याने मन व आत्मशुद्धी होऊन अहंकाराचा नाश होतो. जन्मोजन्मांतराचे दोष व पापे नष्ट होऊन मोक्षप्राप्ती लाभते, अशी दत्त संप्रदायात श्रद्धा आहे.


