नागपूर : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा स्नेह जपला जात असतानाच दोन गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करून डॉ. पंकज भिवटे यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे एका अतिगंभीर रुग्णाला नागपूरच्या AIIMSमध्ये मध्यरात्री उपचार मिळाले, तर अपघातात एक पाय निकामी झालेल्या दुसऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
मध्य प्रदेशातील अरुण कुमार बोरकर हे अतिगंभीर आजाराशी झुंज देत होते. योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांची चिंता वाढली होती. यानंतर त्यांनी रात्री १२ वाजता ऑल इंडिया धनगर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेश प्रभारी तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज भिवटे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. भिवटे यांनी तात्काळ राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून नागपूर AIIMSमध्ये रुग्णाची माहिती दिली. त्यानंतर रात्री १ वाजता अरुण कुमार बोरकर यांना अतिदक्षता विभागात दाखल करून योग्य उपचार सुरू करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. भिवटे यांचे आभार मानले.
दुसरीकडे, मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील आदित्य माहोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा एक पाय निकामी झाला होता. गाझीपूरचे सरपंच दिवनाले यांनी याबाबत डॉ. पंकज भिवटे यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. भिवटे यांनी नागपूर येथील डॉक्टरांशी संपर्क साधून आदित्य माहोरे यांच्या उपचाराची व्यवस्था केली. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पायाची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. दोन्ही रुग्णांना मदत मिळवून देत डॉ. पंकज भिवटे यांनी रक्षाबंधनाचा दिवस माणुसकीच्या भावनेने साजरा केला. यापूर्वीही त्यांनी अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्याचे तत्कालीन वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून त्यांनी ५५ रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला होता. गरजू रुग्णांच्या अडचणीच्या काळात तातडीने मदतीसाठी पुढे येत डॉ. पंकज भिवटे यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन रुग्णांना उपचार मिळवून देत त्यांनी माणुसकीचा अध्याय पुन्हा अधोरेखित केला.


