अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील ज्येष्ठ व ख्यातनाम तबलावादक गुरुवर्य स्व. अच्युत सुतार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ‘नाद वंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अच्युत सुतार शिष्यवृंद, अहिल्यानगर यांच्या वतीने या संगीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीत क्षेत्रातील गुणीजन पं. रेवन्नाथ भनगडे, केशव गाडेकर, अंगद गायकवाड, मकरंद खरवंडीकर आणि पवन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. स्व. अच्युत सुतार यांनी तबलावादन, अध्यापन, संगीतप्रसार आणि गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. नामवंत गायकांना तबल्याची साथ देण्यासोबतच त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. विविध घराण्यांतील गुरूंकडून प्रशिक्षण घेत त्यांनी तबलावादनाची स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली होती.
कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे जन्मलेल्या स्व. सुतार यांच्या कलासाधनेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या शिष्यगणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्व. अच्युत सुतार यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन संयोजन समितीचे सतीश काळे, प्रशांत थोरात, अभिजित राऊत, मुकुंद बोरकर, बिभीषण सूर्यवंशी, प्रफुल्ल जाधव, दादा गावडे, श्याम नानेकर, महेंद्र पळसकर आणि बन्सी शेळके यांनी केले आहे.


