नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. येत्या २५ जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे जीएमआर समूहाकडे हस्तांतरित केला जाणार असून, यामुळे विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग मिळणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार हस्तांतरण सोहळा अत्यंत साधेपणाने आणि अनावश्यक खर्च टाळून आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.विमानतळाच्या विस्तारासाठी जीएमआर समूहाकडून सुमारे ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत ४ हजार मीटर लांबीचा नवा समांतर धावपट्टी मार्ग (रनवे), ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे अत्याधुनिक टर्मिनल भवन आणि जागतिक दर्जाच्या कार्गो सुविधा उभारल्या जाणार आहेत.त्यामुळे भविष्यात नागपूर विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे.
हा संपूर्ण विकास प्रकल्प दोन टप्प्यांत पुढील आठ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, या प्रकल्पामुळे शहराला मध्य भारतातील महत्त्वाचे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्यास मोठी चालना मिळेल. तसेच रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.नागपूर विमानतळाच्या या हस्तांतरणाकडे केवळ प्रशासकीय बदल म्हणून नव्हे, तर शहराच्या विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.


