भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आर.सी. पाटील पुलाजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दाम्पत्य दुचाकीवरून भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जात होते. आर.सी. पाटील पुलाजवळ पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि दुर्दैवाने ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालवणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिवंडीहून ठाण्याकडे जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवत घटनास्थळी पाहणी केली. तसेच जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अॅम्बुलन्स आणि बचाव पथकाला तातडीने हालचाल करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ट्रक चालकाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


