नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा नियम समोर आला आहे. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर आता अधिक कठोर कारवाई होणार असून दंडासोबतच कायदेशीर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
देशभरात रोज लाखो नागरिक इंडियन रेल्वे मधून प्रवास करतात. मात्र काही प्रवासी अजूनही विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करतात. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.नव्या नियमानुसार जन विश्वास अधिनियम २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ मध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार विनातिकीट प्रवास, वापरलेले तिकीट पुन्हा वापरणे किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रवास करताना पकडले गेल्यास प्रवाशाकडून संपूर्ण प्रवासभाडे वसूल केले जाईल, त्यासोबत स्वतंत्र दंडही आकारला जाणार आहे.
आधी या प्रकारासाठी किमान २५० रुपये दंड आकारला जात होता. मात्र आता हा दंड दुप्पट करून ५०० रुपये करण्यात आला आहे. हा नवा नियम २० जून २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाईल. दंड न भरल्यास किंवा पुन्हा पुन्हा उल्लंघन झाल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.या नव्या नियमामुळे प्रवास अधिक शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


